दिलेलं आश्वासन पूर्ण करा, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करुन द्या- राजू शेट्टी
- By - Team Agricola
- Dec 27,2024
दिलेलं आश्वासन पूर्ण करा, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करुन द्या- राजू शेट्टी
विधानसभेच्या निवडणुकीत महायुती सरकारनं शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्याची पुर्तता राज्य सरकारने तातडीने करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी केली आहे. सरकारनं दिलेला शब्द पूर्ण करावा. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करुन द्यावा, अशी मागणी केली. त्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने 1 जानेवारी रोजी निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली आहे.
सोयाबीन, कापूस, तूर, दूध, साखर, डाळी आर्दीच्या पडलेल्या दरामुळं शेतकरी मातीमोल झालेला आहे. उत्पादन खर्चापेक्षा कमी किंमतीत शेतकऱ्यांना आपला शेतीमाल विकावा लागत असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. रासायनिक खतांच्या किंमतीत भरमसाठ वाढ झालेली आहे. डी.ए.पी. मध्ये पुन्हा २५० रुपयांची वाढ झालेली आहे. किटनाशके, तणनाशकांच्या किंमतीत मोठी वाढ झालेली आहे. सरकार हमीभाव जाहीर करते. पण हमीभावाचा कायदा अस्तित्वात नसल्याने शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी किंमतीत शेतीमाल विकावा लागत असल्याचे शेट्टी म्हणाले.