new-img

कांदा उत्पादक संकटात, लासलगावमध्ये कांद्याला हजार रुपये दर

कांदा दरात सध्या कमालीची घसरण झाली असून कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. कांदा निर्यातबंदीनंतर दररोज कांद्याच्या दरात घसरण होत आहे. दुसरीकडे कांद्याची आवक मात्र अनेक बाजार समित्यांमध्ये वाढत आहे. त्यामुळे मागील आठ दिवसांच्या कालावधीत जवळपास सातशे ते आठशे रुपयांची घसरण कांदा बाजारात पाहायला मिळाली. नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांदा दरात सतत घसरण होत असून शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडत आहे.

काही दिवसांपूर्वी कांदा दर प्रति क्विंटल 3 ते साडेतीन हजारांच्या घरात होता. शुक्रवारी (दि. 26) तोच दर हजार रुपयांवर येऊन ठेपलाय. नाशिकमधील प्रमुख लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे बाजारभाव पुन्हा घसरलेत. कांद्याला सरासरी केवळ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरलीये. शासनाच्या स्मार्ट प्रकल्पाच्या अंतर्गत बाजार माहिती विश्लेषण आणि जोखीम कक्षाने दिलेल्या अहवालानुसार लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याची 8 हजार 500 क्विंटल इतकी आवक झाली. ज्यात कमीत कमी 500 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला, तर सरासरी केवळ 1000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.