new-img

कांदा निर्यातबंदी हटवली, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील बंदी हटवण्याचा निर्णय घेतला आहे. कांदा दर नियंत्रणासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर डिसेंबर महिन्यात बंदी घातली होती. परंतू आता सरकारने हा निर्णय मागे घेतला आहे. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी या निर्णयाची माहिती माध्यमांना दिली. या निर्णयाची अधिकृत सूचना लवकरच सरकारकडून काढण्यात येईल, असेही त्या म्हणाल्या.

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर 8 डिसेंबर रोजी बंदी घातली होती. देशांतर्गत उपलब्धता वाढवणे आणि किमती नियंत्रणात राहण्याच्या उद्देशाने सरकारने हा निर्णय घेतला होता. या निर्णयानुसार 31 मार्चपर्यंत बंदी कायम राहणार होती. मात्र लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कांदा निर्यातीचा निर्णय मागे घेतल्याचे दिसत आहे.

रविवारी (दि. 18) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत केंद्रीय मंत्री समितीची बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, सरकारने जरी कांदा निर्यातील परवानगी दिली असली तरीही, त्यावर मर्यादा ठेवण्यात आली आहे. 3 लाख मेट्रिक टन कांदा निर्यात करण्यास समितीने परवानगी दिली आहे.