new-img

सोयाबीन-कापूस उत्पादकांना मिळणार लवकरच मदत

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. सन 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेप्रमाणे प्रति हेक्टरी 5 हजार रुपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय सोमवारी कृषी विभागाने घेतला असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय कृषी विभागाने निर्गमित केला आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयाची कृषी विभागाने कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात तातडीने अंमलबजावणी केली आहे. राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना किमान 1000 रुपये तर 2 हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी 5 हजार रुपये या प्रमाणे अर्थसहाय्य देण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता दिली आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एकूण 1548 कोटी 34 लाख रुपये इतका तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2646 कोटी 34 लाख रुपये असा एकूण 4192 कोटी 68 लाख रुपये इतक्या निधी खर्चास मान्यता देण्यात आली आहे. 
लोकसभा निवडणुकीच्या आधीच शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याच्या निर्णयाची घोषणा केली होती. त्याचबरोबर त्याची अधिकृत घोषणा नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पातही करण्यात आली होती. त्यानुसार सोमवारी शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच शासनाच्या घोषणेप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होईल.