new-img

हिवरगाव उपबाजार टोमॅटो लिलावास प्रारंभ

सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हिवरगाव उपबाजार आवारात स्वातंत्र्य दिनाचे (दिनांक 15 ऑगस्ट) औचित्य साधून दुपारी दोन वाजता तालुक्याचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते व युवा नेते उदय भाऊ सांगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत टोमॅटो या शेतमालाच्या खरेदी विक्रीचा शुभारंभ करण्यात आला. पहिल्याच दिवशी टोमॅटो शेतमालाची हिवरगाव उपबाजार आवारात मोठ्या प्रमाणात आवक झाली होती. पहिल्याच दिवशी सुमारे शंभर ते दीडशे वाहने घेऊन शेतकरी शेतमाल विक्रीसाठी आले होते.

टोमॅटो खरेदीत विक्रीच्या प्रारंभीला हिवरगाव येथील शेतकरी संपत घुगे यांच्या टोमॅटो मालाच्या एका जाळीस 1,351 रुपये भाव देऊन रिजवान शेख (रा. संगमनेर) या व्यापाऱ्याने खरेदी केला. यावेळी बाजार समितीच्या वतीने संबंधित शेतकरी व व्यापारी यांचा सत्कार करण्यात आला.

हिवरगाव हे सिन्नर व निफाड तालुक्याच्या सीमेवर येते. तसेच हिवरगाव पंचक्रोशीतील शेतकरी बांधवांना शेतमाल विक्रीसाठी जवळपास मार्केटची सुविधा उपलब्ध नाही. बाजार समितीने याबाबत योग्य तो विचार करून शेतकरी बांधवांना शेतमाल विक्री व्यवस्थेत वेळ, श्रम आणि पैसा खर्च करावा लागणार नाही या हेतूने हिवरगाव उप बाजारात टोमॅटो लिलाव सुरू केला आहे.

शेतकरी बांधवांनी आपला टोमॅटो शेतमाल प्रतवारी करून 22 किलो वजनासह क्रेट मध्ये विक्रीसाठी आणावा, असे आवाहन बाजार समितीने यावेळी केले. हिवरगाव उपबाजार येथे दर सोमवार ते रविवार सप्ताहातील सर्व दिवस दुपारी दोन ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत टोमॅटो शेतमालाचा लिलाव सुरू राहील, तरी सर्व शेतकरी बांधवांनी आपली कुचंबना व नुकसान टाळण्यासाठी बांधावर किंवा शिवारमापाने विक्री न करता आपला टोमॅटो शेतमाल हिवरगाव उपबाजार आवारात विक्रीसाठी आणावा आणि शेतमाल विक्रीची रोख रक्कम घेऊन जावी, असे आवाहन बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.